चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे एकेकाळी आदर्श गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र ५ नोव्हेंबरच्या रात्री या गावात घडलेल्या भयानक घटनेने संपूर्ण जिल्हाच नव्हे तर परिसर हादरला आहे. दारूच्या नशेत वेडापिसा झालेल्या मुलाने स्वतःच्या माय-बापांची गाढ झोपेत कुर्हाडीने हत्या करून अखेर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सुभाष डुकरे (वय ३५) हा काही दिवसांपासून दारूच्या नशेत सतत वाद घालत होता. दारूसाठी तो गावातल्या लोकांकडे पैसे मागत असे, तसेच घरातील शेतीमाल विकण्याचा हट्ट करत होता. या स्वभावाला कंटाळलेल्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला होता. याच रागातून त्याने हा भीषण निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनेच्या रात्री विशाल घरातच आई-वडिलांसोबत झोपला होता. मध्यरात्री त्याने कुर्हाडीने वडील सुभाष डिगांबर डुकरे (वय ६०) आणि आई लताबाई सुभाष डुकरे (वय ५५) यांच्या डोक्यावर व मानेवर वार करत त्यांचा जागीच खात्मा केला. त्यानंतर त्याने घरातच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळपर्यंत ही घटना गावकऱ्यांच्या लक्षात आली नव्हती. योगायोगाने गावात एका अंत्यविधीचा कार्यक्रम असल्याने बहुतेक सर्व गावकरी तिकडे गेले होते. त्यांचा मोठा मुलगा शरद सुभाष डुकरे कृषी सेवाकेंद्र चालवतो. त्याच्या मुलांनी आजी-आजोबा घर उघडत नाहीत असे सांगितल्यावर तो घरी गेला. घर आतून बंद असल्याने खिडकी तोडून आत गेल्यावर समोर हे विदारक दृश्य उभं होतं — आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात, आणि मुलगा गळफास घेतलेला!
त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.
या घटनेची फिर्याद शरद सुभाष डुकरे यांनी दिली असून विशाल हा दारूच्या व्यसनाधीनतेमुळे वारंवार आई-वडिलांना त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. चिखली पोलिसांनी या प्रकरणी मृत विशाल सुभाष डुकरेविरुद्ध अप. क्र. ८७७/२५ कलम १०३ (१) बीएनएस नुसार गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, ठाणेदार भूषण गावंडे, पीएसआय शरद भागवतकर, तसेच फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
या अमानुष घटनेने एकेकाळी आदर्श म्हणून गौरवले गेलेले सावरगाव डुकरे गाव शोकसागरात बुडाले आहे. गावकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे —
“दारूने घर उद्ध्वस्त केलं…”
EXCLUSIVE :दारुड्या मुलाने आई-वडिलांची गाढ झोपेत निर्दयी हत्या करून केली आत्महत्या; एकेकाळी ‘आदर्श गाव’ असलेल्या सावरगावात घडली भयावह घटना ..! गावकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे —“दारूने घर उद्ध्वस्त केलं…!”













