खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – जुन्या वादातून एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची सुडी पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील धोत्रा उजाड शिवारात घडली. या घटनेत सुमारे ₹३५ हजारांचे नुकसान झाले असून, ही बाब २६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
शहरातील सतीफैल भागातील कासम छोटू चौधरी यांच्या मालकीच्या शेतात सोयाबीनची सोंगणी करून सुडी घातली होती. मात्र, १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याच भागातील गुलाबचांद शाहीदचांद चौधरी याने ही सुडी पेटवून दिली, असा आरोप आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर कासम चौधरी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी गुलाबचांद चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान काळबागे हे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
गेल्या काही दिवसांत जुन्या वादातून अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातून होत आहे.
वादातून पेटवली शेतकऱ्याची सोयाबीनची सुडी..! धोत्रा शिवारातील घटना….
Published On: October 29, 2025 10:13 am












