मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेळगाव आटोळ येथे नातेवाईकांमधील वाद मिटविण्यासाठी घेतलेल्या बैठकीदरम्यानच गोंधळ उडाला. या गोंधळात एका महिलेला लोखंडी रॉडने तर तिच्या आईला काठीने मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून अंढेरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कपिल भांबळे (वय ३२, रा. कृष्णनगर, चिखली) या १२ ऑक्टोबर रोजी माहेरी शेळगाव आटोळ येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. नातेवाईकांमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी सर्वजण बैठकीसाठी एकत्र आले असताना अचानक वाद वाढला आणि उपस्थित आरोपींनी हल्ला चढविला.
या हल्ल्यात आरोपींनी मनीषा भांबळे यांच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्यांना जखमी केले, तर त्यांच्या आईवर लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच फिर्यादीच्या भावालाही आरोपींनी चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर मनीषा भांबळे यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाश दिलीप जाधव, प्रवीण दिलीप जाधव, दिलीप संपत जाधव आणि प्रमिला दिलीप जाधव (सर्व रा. शेळगाव आटोळ) यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गणेश देढे करत आहेत.













