मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील वडोदा गावात एका ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह शेतात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नामदेव इंगळे (वय ५५, रा. वडोदा) यांचा मृतदेह १७ ऑक्टोबर रोजी संत वियोगी महाराज मंदिराजवळील गुलाबराव समाधान गायकवाड यांच्या शेतात आढळला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
या प्रकरणी शाम श्रीराम तायडे (वय ४५, रा. वडोदा) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास मुके करीत आहेत.













