मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): भोरसी गावातील एका २१ वर्षीय विवाहितेवर सासरच्यांनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुबीना परवीन शेख सादिक (वय २१, रा. भोरसा भोरसी, मूळ रहिवासी मोहदरी, ता. चिखली) हिने पोलिसांत तक्रार दिली आहे. तिचा विवाह आरोपी शेख सादिक शेख रसूल याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरच्यांनी “लग्नात आमचा मानपान झाला नाही, लग्न अपेक्षेप्रमाणे झाले नाही” असे सांगून तिच्यावर वारंवार वाद निर्माण करून मानसिक छळ केला.
तसेच, “तुझ्या वडिलांकडून विहीर आणि पाईपलाईनसाठी सात लाख रुपये आण, नाहीतर तुला सासरी ठेवणार नाही” असे म्हणून तिच्यावर शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शेख सादिक शेख रसूल, शेख रसूल शेख अफसर, जुबेदा बी शेख रसूल, तसलीम पठाण हुसेन पठाण आणि रिजवाना बी साजिद पठाण (सर्व रा. भोरसा भोरसी, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांच्याविरुद्ध कलम ८५, ११५, ३५१(२), ३५२ आणि ३(५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना बोर्डे आणि पोलीस चोपडे करीत आहेत.













