(शेळगाव आटोळ – बुलडाणा कव्हरेज न्युज)
शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात “माळ पडते” हे पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.
आरक्षण लागू झाल्यानंतर इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी आपली तयारी सोशल मीडियावरून जाहीरही केली आहे. आज मंगरुळच्या माजी सरपंच सुशीला दामोदर शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून “मी शेळगाव आटोळ सर्कलमधून भावी सदस्य म्हणून तयार आहे” असा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मिसाळवाडीचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक सुनील मिसाळ यांनीही अचानक आपल्या पत्नीला राजकीय मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसतेय. ते गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
याचबरोबर, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास मुजमुले यांनीही आता मागे थांबायचे नाही, असा निर्धार केला आहे. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने, लढे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जोरदार पातळीवर आवाज उठवला आहे.
या सगळ्या हालचालींमुळे शेळगाव आटोळ सर्कलमधील निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. प्रत्येकजण आपापल्या कार्याची, जनसंपर्काची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता पाहायचं म्हणजे — महिला आरक्षणाच्या या राजकीय शर्यतीत कोण पुढे जातं आणि कोणाला मतदारांचा आशीर्वाद लाभतो!
शेळगाव आटोळ सर्कलमध्ये ‘मागास प्रवर्ग महिला आरक्षण’ लागल्याने इच्छुकांची गर्दी; माजी सरपंच, कार्यकर्ते आणि संघटन नेत्यांची सुरू झाली चुरस!













