खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) — गवत कापण्याच्या किरकोळ कारणावरून पुतण्याने काकावर काठीने हल्ला करून जखमी केल्याची घटना बोरीअडगाव शिवारात १२ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष प्रल्हाद सुरवाडे (वय ५४) हे आपल्या शेतातील धुऱ्यावर गवत कापत होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या स्वप्नील अनिल सुरवाडे (वय २४, रा. बोरीअडगाव) हा तेथे आला. गवत कापू नको असे म्हणत त्याने काकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच वाद तीव्र झाला आणि स्वप्नीलने संतापाच्या भरात काठीने काकांच्या कपाळावर व डोळ्याजवळ वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
यानंतर आरोपीने शिवीगाळ करत काकांना जिवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पळ काढला. जखमी सुभाष सुरवाडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली असून, खामगाव ग्रामीण पोलिसांनी स्वप्नील सुरवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
गवत कापण्याच्या वादातून पुतण्याचा काकावर काठीने हल्ला; खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!
Published On: October 15, 2025 11:09 am













