मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या विशेष मदत पॅकेजमध्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या अनुषंगाने माजी आमदार संजय रायमूलकर यांनी आज, दि. १० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली. त्यानंतर एका तासातच शासनाचे परिपत्रक निघाले असून, मेहकर व लोणार तालुक्याचा पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी राज्य शासनाने गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी करून विशेष मदत पॅकेज व सवलती लागू केल्या. त्यामध्ये राज्यातील २५३ तालुक्यांचा समावेश होता. परंतु जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान मेहकर व लोणार तालुक्यात झाले असतानाही या तालुक्यांचा यामध्ये समावेश नव्हता.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय रायमूलकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्ता भरणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मेहकर व लोणार तालुक्यांचा विशेष मदत पॅकेज व सवलतीमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली.
मदतीसाठी केला पाठपुरावा
जून महिन्यात मेहकर व लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रतापराव जाधव व संजय रायमूलकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना ५५ कोटी ७४ लाख रुपये व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले. जमीन खरडणे व शेतात गाळ येऊन नुकसान होणे याबाबतचे साडेसहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, अशीही माहिती रायमूलकर यांनी दिली.
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान मेहकर व लोणार तालुक्यात झाल्याचे मान्य करून यादीत अनवधानाने हे दोन तालुके सुटले असल्याचे रायमूलकर यांना सांगितले. तसेच दोन्ही तालुक्यांचा विशेष मदत पॅकेज व सवलतीमध्ये समावेश करत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रायमूलकर यांच्याशी संपर्क साधून मेहकर आणि लोणार तालुक्यांचा विशेष मदत पॅकेज व सवलतीमध्ये समावेश करत आहोत, तसा शासन आदेशही प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करत आहोत, असे सांगितले. त्यानंतर दोन्ही तालुक्यांचा पॅकेज व सवलतीमध्ये समावेश झाल्याचे शासनाचे परिपत्रक जारी करण्यात आले.














