चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील वळती येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक बदलीच्या निर्णयामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या बदली धोरणानुसार, सध्या शिक्षकांच्या बदल्या सुरू असून, यानुसार शाळेत उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक शेख फारुख सर यांची वैरागड येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दिव्यांग शिक्षक विलास डुकरे सर यांची नियुक्ती झाल्याने पालकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयाविरोधात वळतीतील पालकांनी विद्यार्थ्यांसह चिखली येथील उपगट शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि बदली तातडीने रद्द करण्याची मागणी केली.
वळतीच्या या शाळेत सध्या १९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शेख फारुख सर आणि मुख्याध्यापिका हाके मॅडम यांच्या अथक प्रयत्नांमुळे मागील काही वर्षांत शाळेची पटसंख्या लक्षणीय वाढली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही मोठी सुधारणा झाली आहे. यापूर्वी खासगी शाळेत शिकणारी अनेक मुले पालकांनी या शिक्षकांच्या समर्पित कामगिरीमुळे गावच्या शाळेत दाखल केली. पालकांचा विश्वास जिंकणाऱ्या या शिक्षकांनी शाळेची प्रतिष्ठा आणि गुणवत्ता उंचावली. मात्र, प्रशासनाकडून अशा कार्यक्षम शिक्षकाची बदली आणि त्यांच्या जागी दिव्यांग शिक्षकाची नियुक्ती यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती पालकांना आहे. त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला सांगितले की, अशा निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ आम्ही खपवून घेणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
मोर्चादरम्यान उपगट शिक्षणाधिकारी वाघमारे यांनी आंदोलनकर्त्या पालकांशी संवाद साधला. त्यांनी विलास डुकरे सर यांची नियुक्ती थांबवून शेख फारुख सर यांना कायम ठेवण्याचा किंवा लवकरच दुसऱ्या सक्षम शिक्षकाची नियुक्ती करण्याचे तसे इयत्ता ७ वी आणि ८ वी साठी अतिरिक्त शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर पालकांनी मोर्चा शांततेत संपवला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप सुसर, उपाध्यक्ष विकार पटेल, सदस्य गोपाल भागिले, प्रशांत धनवे, समाधान धनवे, हिमायून सौदागर यांच्यासह गावातील पालक आणि इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तथापि, शाळा समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी स्पष्ट केले की, जर प्रशासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता वेळेत झाली नाही, तर सर्व विद्यार्थ्यांसह जिल्हास्तरावर आंदोलन केले जाईल. वळती गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी एकजुटीने त्यांची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली आहे. आता प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.