शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून साजरा झाला सामाजिक भान जपणारा गणेशोत्सव गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप

shetkari nete ravikant tupakar ganpati visarjan

बुलडाणा, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गणरायाच्या आरत्या, ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर भावनिक वातावरणात गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यंदा सामाजिक भान जपणारा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा केला. सौ. शर्वरीताई तुपकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला शेतकरी आंदोलनाचा देखावा समाजमाध्यमांवर विशेष लोकप्रिय ठरला.

दररोजच्या आरतीचा मान समाजातील वंचित आणि संघर्षशील व्यक्तींना देण्यात आला. यामध्ये दत्तक कन्या, शहीद जवानांच्या पत्नी, मुलाला एमबीबीएससाठी शिकवणारा पंक्चर कामगार, सलून व्यवसायातून पत्नीला शिक्षण देऊन नोकरीला लावणारा व्यक्ती, दूध उत्पादक शेतकरी, रिक्षा चालवणारी महिला, विशेष सेवा पदकप्राप्त पोलिस कॉन्स्टेबल, परिचारिका (नर्सेस) तसेच निवृत्त सैनिक यांचा समावेश होता. प्रत्येक आरतीच्या माध्यमातून संघर्ष, कर्तृत्व आणि प्रेरणेचा गौरव करण्यात आला.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू करताना सामाजिक बांधिलकी, लोकजागृती आणि एकतेचा संदेश देण्याचा विचार मांडला होता. यंदाच्या क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमातून हा संदेश प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे, अशी चर्चा परिसरात रंगली.

मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी

या सोहळ्यात तरुणांनी विशेष गर्दी केली. परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या तालावर रविकांत तुपकर यांच्या कुटुंबीयांनी चौकट नृत्य सादर केले. यावेळी महिला भगिनींनीही ठेका धरला. रविकांत तुपकर आणि सौ. शर्वरीताई तुपकर यांनी फुगडी खेळून आनंद द्विगुणित केला. विसर्जनावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत गणपती बाप्पांचे सारथ्य केले. ढोल-ताशे आणि डीजेच्या गजरात, भावपूर्ण वातावरणात पैनगंगा नदीत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. उत्साह आणि ओढ यांच्यासह डोळ्यांत अश्रू आणणारा हा निरोपाचा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी आसमंत दणाणून गेला.

यावेळी रविकांत तुपकर यांनी गणपती बाप्पांना प्रार्थना केली की, “शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची सद्बुद्धी सरकारला मिळो, शेतकरी सुखी, समृद्ध आणि प्रगत होवो, आणि शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होवो.”

हा गणेशोत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता, समाजातील वंचित आणि प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करणारा, समाजजीवनाला नवी दिशा दाखवणारा आणि संघर्षातून प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!