चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामासाठी आवश्यक वाळू मिळत नसल्याने अनेकांची कामे थांबली आहेत. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते नितीन राजपूत आणि माजी कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक यांनी याबाबत शासनाकडे निवेदन देऊन तातडीने वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
शासनाने ३० एप्रिल २०२५ रोजी वाळू धोरण २०२५ जाहीर केले होते. या धोरणानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना ही वाळू मिळालेली नाही. परिणामी, त्यांची घर बांधकामे रखडली आहेत आणि त्यांचे हाल सुरू आहेत.
चिखली तालुक्यात सुमारे ८३०० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यासाठी एकूण ४१ हजार ब्रास वाळूची आवश्यकता आहे. आतापर्यंत फक्त ४००० लाभार्थ्यांची कामे सुरू झाली आहेत, तर उर्वरितांना वाळूच्या अभावामुळे प्रगती होत नाही. या स्थितीमुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
महिलांसाठी रोजगाराची संधी! दरमहा ७००० रुपये मिळवा, पात्रता आणि अर्ज कसा करावा?
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी या मुद्द्यावर शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाळू पुरवठा करण्यात यावा. अन्यथा, संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिखली आणि चिखली पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले आहे.













