चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील नगर परिषद हद्दीत प्रभाग क्रमांक ६ मधील नगर परिषद शाळा क्रमांक १ येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप होत आहे. हे भवन शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र ठरणार असून, ते शहराच्या विकासातही योगदान देणारे असणार आहे.
मात्र, या कामात पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार झाल्याने जनतेच्या कररूपी पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे चिखली शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा उल्लेख केला असून, हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
शेतकऱ्यांना सिंचन पाईपसाठी 55% पर्यंत अनुदान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या
मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी चिखली शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामात भ्रष्टाचार सुरू आहे. कॉलम वाकडे झालेले आहेत, लोखंडी सपोर्ट तुटलेले आहेत, पाया आणि मूळ आधारच कमकुवत झालेला आहे, आणि आता पुन्हा सिमेंट काँक्रीट टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.
या सर्व गोष्टींमुळे कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे उघड आहे. परिणामी, शासकीय निधीचा अपव्यय होऊन शाळेतील मुलांसह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार, अभियंता आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, निकृष्ट काम त्वरित दुरुस्त करून मुलांच्या सुरक्षेची हमी द्यावी, खराब काम रद्द करून शासकीय निकषांनुसार नव्याने गुणवत्तापूर्ण बांधकाम करावे, आणि झालेल्या निधी अपव्ययाची सखोल तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात म्हटले आहे. जर भविष्यात या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
नगर परिषद प्रशासनाने या गंभीर मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील मागण्यांप्रमाणे त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय निधीच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा चिखली शहर काँग्रेसने दिला आहे.
बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, युवक काँग्रेसचे रिक्की काकडे, बाजार समिती संचालक जय बोन्द्रे, शहेजादअली खान, जाकीर भाई यांची उपस्थिती होती. तर मुख्याधिकारी चिखली यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोद्दीन काझी, डॉ. मोहम्मद इसरार, प्रा. निलेश गावंडे, युवक काँग्रेसचे रिक्की काकडे, प्रदीप पचेरवाल, गोकुळ शिगणे, विजय गाडेकर, भगवानराव खरात, शहेजाद भाई, जय बोन्द्रे, कैलास खराडे, खलील बागवान, जाकीर शेख, डॉ. अमोल लहाने, जका भाई, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, भास्कर चांदोरे, आरिफ बागवान, दीपक इंगळे, प्रशांत भटकर, प्रा. मिलिंद मघाडे, पवन गवारे, मंगेश जागृत, सुनील सुरडकर, नजीर कुरेशी, सोहेल शेख, राहुल चवरे, रवी वानखेडे, समीर खान यांच्यासह सेनेचे श्रीराम झोरे, आनंद गैची, रवी पेटकर, पुंजाजी शेळके, हारून भाई, अजीम भाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.













