साखरखेर्डा (अंकुश पाटील- बुलढाणा कव्हरेज न्यूज): शाळा म्हटलं की फक्त पुस्तकी ज्ञान देणारी जागा नव्हे, तर मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणारी एक पवित्र संस्था असते. सहकार विद्या मंदिर ही असंच एक उदाहरण आहे. या शाळेच्या मजबूत पायावर आधारवड राधेश्यामजी चांडक भाईजी आणि कोमलताई झंवर मॅडम यांचा मोठा वाटा आहे, जो कधीही विसरता येणार नाही. त्याचप्रमाणे श्री. सूकेशजी झंवर सर यांच्या दूरगामी दृष्टी आणि नेतृत्वामुळे शाळेची कीर्ती आणखी वाढली आहे.
गांव की मिट्टी से निकलकर टेक की दुनिया में चमकने वाले श्रीधर वेम्बू की जीवनी
या समृद्ध शैक्षणिक वारशाला साजेसा असा बैलपोळा सण सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथे खूप जल्लोषात, आनंदाच्या वातावरणात आणि सांस्कृतिक रंगात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. सत्यानंद नखोद सर यांनी भूमिका बजावली. त्यांच्या भाषणात ते म्हणाले, “बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे. शेतीच्या प्रत्येक कामात तो सुख-दुःखात भागीदार होतो. त्यामुळे त्याची काळजी घेणे आणि आयुष्यभर संगोपन करणे ही शेतकऱ्याची मुख्य जबाबदारी आहे.” त्यांनी हेही जोर देऊन सांगितले की, बैल कधीही कसायाला विकू नये, असा संवेदनशील संदेश देत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश लंबे सर उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची मजा आणखी वाढवण्यासाठी पाखरूची ध्वनिफीत लावण्यात आली, ज्याने शाळेचा परिसर पारंपरिक उत्साहाने भरून गेला. सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री. सुजितकुमार लहाने सर यांनी उत्साही आणि कुशलतेने सांभाळली.
शाळेची सजावट आणि फलक लेखनाचे काम श्री. नारायण दानवे सर आणि श्री. धम्मपाल आराख सर यांनी कल्पकतेने आणि मन लावून केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः मातीचे बैल बनवून आणले आणि त्यांचे प्रदर्शन करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. रविंद्र म्हळसने सर यांनी आभार मानले आणि सर्व उपस्थितांचे मनापासून धन्यवाद दिले. बैलपोळा या पारंपरिक सणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, पशुप्रेम, शेतीचे महत्व आणि परंपरांचे जतन याबाबत प्रेरणा देण्यात आली.













