बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आपल्या अभिनव कल्पनांद्वारे गाव आणि ग्रामस्थांचा विकास करणाऱ्या सरपंचांचा ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इसरूळ गावात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रभावीपणे राबवणे, तसेच सर्व घटकांतील लोकांना शासकीय कामांमध्ये येणारे अडथळे दूर करून देणे आणि विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने वाटचाल करणे, यामुळे सतीश पाटील यांनी हा राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार पटकावला.
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
हा सोहळा 29 व 30 जुलै 2025 रोजी लोणावळा येथील सेरेनिटी रिसॉर्ट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सरपंच परिषद आणि जयंत पाटील मित्र मंडळ, कुर्डू यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सरपंचांचा सन्मान माजी आयुक्त रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत दळवी, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, जलतज्ञ अनिल पाटील, जल अभ्यासक सतीश खाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच, त्यांनी ग्रामविकासाच्या विविध संकल्पनांवर सरपंचांना मार्गदर्शनही केले.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील आणि राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. चंद्रकांत दळवी यांनी त्यांच्या निढळ गावातील विकासाची यशोगाथा सांगितली. सलग 42 वर्षे ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी दुष्काळी गावाचे हिरव्यागार गावात रूपांतर केले आहे. गावात कुराडबंदी, चराईबंदी, नशाबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. गावचे दरडोई उत्पन्न दहापट वाढले आहे. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतीची इमारत आणि प्राथमिक शाळा या राज्यातील रोल मॉडेल म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांनी सरपंचांना निढळ गावाला भेट देण्याचे आव्हान केले आणि ‘निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाचे वाचन करण्याचा सल्ला दिला. ग्रामविकास हा एका दिवसाचा किंवा काही वर्षांचा विषय नसून सातत्य हा त्याचा मूलभूत मंत्र आहे, असे त्यांनी नमूद केले. यामुळेच ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेडी पुढे जाऊ शकतील, असे त्यांचे मत होते.
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती शिवराय आणि त्यांची ग्रामनीती यावर सुरेख मार्गदर्शन केले. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी प्रथम कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात न लावण्याची ताकीद सैनिकांना दिली होती. तसेच, शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
जल अभ्यासक सतीश खाडे यांनी पाण्याचे प्रदूषण आणि त्यावरील नैसर्गिक, ऑरगॅनिक उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच, जलतज्ञ अनिल पाटील यांनी पाणी हा ग्रामीण महाराष्ट्राचा महत्त्वाचा विषय असून, त्याला गांभीर्याने घेतल्यास भविष्यातील अनेक आपत्तींपासून लोकांचे संरक्षण होऊ शकते, असे सांगितले. ‘स्वच्छ जलसमृद्ध गाव’ हाच भविष्यातील मूलमंत्र सरपंचांनी अंगीकारावा, अशी सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे, राज्यभरातील सरपंचांच्या अभिनव कल्पना पाहून त्यांनी ‘ग्रामविकासाच्या संकल्पना’ या विषयावर पुस्तक प्रसिद्ध करण्याची सूचना केली.
ग्रामरत्न सरपंच सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. ग्रामविकासाच्या अभ्यासकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सरपंचांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.