चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या चिखली शहरात सध्या अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सांडपाण्याची अनियंत्रित विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामात होणारी टाळाटाळ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेने तब्बल २ कोटी ८१ लाख रुपयांचा ठेका दिला आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही शहरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य कायम आहे. यामुळे नागरिकांच्या कररुपी पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप चिखलीकरांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, चिखली शहर काँग्रेसने युद्धपातळीवर स्वच्छता अभियान राबवण्याची आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्याची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.
चिखली तालुक्यात दुर्दैवी घटना: नवरा-बायकोची गळफास घेऊन आत्महत्या…
सोमवारी, २१ जुलै रोजी चिखली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या निवेदनात घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्याबाबत पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ठेक्याची संपूर्ण माहिती, ठेका कोणत्या कंपनी किंवा संस्थेला देण्यात आला, ठेक्याची मंजुरी तारीख आणि कालावधी, ठेक्याचे एकूण आर्थिक मूल्य, निविदा प्रक्रियेची प्रत, निविदेत सहभागी झालेल्या इतर कंपन्यांची माहिती, ठेक्याच्या अटी-शर्तींची छायाप्रत, ठेकेदाराकडून दररोज होणाऱ्या कामकाजाचा तपशील, कचरा संकलनाचे वेळापत्रक, वाहनांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या आणि नगर परिषदेने केलेल्या पडताळणी अहवालाची प्रत यांचा समावेश आहे. याशिवाय, शहरातील नाले स्वच्छता आणि कचरा उचलण्याकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष याबाबत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात नमूद आहे.
चिखली शहर काँग्रेसने आपल्या निवेदनातून नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा ठेका देऊनही शहरात स्वच्छता राखण्यात अपयश का येत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. शहरातील अस्वच्छतेच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. यापूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिखली शहराने चांगली कामगिरी केली होती, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नाल्यांमधील गाळ आणि कचऱ्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्याही वाढल्या आहेत.
या निवेदन सादर करण्याच्या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतरोधीन काजी, दीपक देशमाने, डॉ. मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्रे, प्राध्यापक निलेश गावंडे, प्राध्यापक राजू गवई, सभापती डॉ. संतोष वानखेडे, युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसने नगर परिषदेला या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याचे आणि स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत कोणती कार्यवाही होते, याकडे सर्व चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.
2 thoughts on “२ कोटी ८१ लाख रुपयाचा ठेका असूनही चिखली शहरात दुर्गंधीच: चिखली शहरातील अस्वच्छतेवर काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेला निवेदन”