लोणार (दीपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): लोणार आणि शेगाव तालुक्यात २१ व २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण ५३ गावांतील २६ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
आधीच हुमणी अळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीमुळे पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज आणि उसनवारी करून खरीप हंगामासाठी पेरण्या केल्या होत्या. मात्र, आता पिकांचे नुकसान झाल्याने पुढील पेरणीसाठी त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लोणार तालुक्यात सर्वाधिक नुकसान
२१ जुलै रोजी लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्या व नाले भरून वाहू लागले. नदी-नाल्यांच्या काठावरील पिके वाहून गेली. काही शेतांमध्ये तर तलावासारखे पाणी साचले. या तालुक्यातील ४२ गावांतील जवळपास २४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील मूग, सोयाबीन आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेगाव तालुक्यातही हानी
शेगाव तालुक्यात ११ गावांतील अंदाजे २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावरील मूग आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची मागणी – तात्काळ पंचनामे व मदत
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. “दुबार पेरणी करायची तर पैसे कुठून आणायचे?” असा प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत.