चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील रोहडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. एल. जी. कुंजटवाड यांची शासकीय नियमानुसार पटसंख्या कमी असल्यामुळे अमोना येथे तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. परंतु ही बाब कळताच रोहडा शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून चिखली पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन शिक्षक परत द्यावेत, अशी विनवणी रडतच विद्यार्थी आणि महिला पालकांनी केली . या प्रसंगामुळे परिसरात क्षणभर भावनिक वातावरण निर्माण झाले.
शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देत ही तात्पुरती बदली त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. पालकांचे म्हणणे आहे की, या बदल्यामुळे इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
श्री. कुंजटवाड यांच्या मार्गदर्शनामुळेच शाळेने NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत गांगलगाव केंद्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहडा शाळेत इयत्ता १ ते ५ मध्ये सध्या ८४ विद्यार्थी असून तीन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. सध्या चार शिक्षक कार्यरत असल्याने एक शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. तसेच इयत्ता ६ ते ८ मध्ये ५३ विद्यार्थी असून दोन पदे मंजूर आहेत, तरीही तीन शिक्षक कार्यरत असल्यामुळे एक शिक्षक अतिरिक्त मानण्यात आला आहे.
या संदर्भात गटशिक्षणाधिकारी आर. आर. पाटील यांनी सदर शिक्षक अतिरिक्त असल्याचे स्पष्ट केले. मात्र गावकऱ्यांची व विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेता कुंजटवाड यांना परत बोलावण्यात आले असून त्यांच्या जागी श्री. गभणे यांना अमोना येथे पाठवले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी वाघ यांनी दिली.
शिक्षक बदल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यांच्या भावनिक आंदोलनामुळे प्रशासनाला निर्णयात बदल करावा लागल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.
यावेळी उषा नाडे ,पार्वती लव्हाळे,सुमन खरात, राहुल कळंगे,वर्षा जाधव, नंदकिशोर तायडे, लिलाबाई लव्हाळे, अनिता शेळके, प्रतिभा शेळके, संगीता खरात, उषा जाधव, अर्चना खरात, शुभांगी बुरकुल, हिना कौसर शेख रईस, लक्ष्मी कळंगे, नीता भुसारी, पुष्पा भुसारी ,कुशीवर्ता सोरमारे, दिपाली मांजरे, रंजना तायडे, उज्वला सोरमारे, रुक्मिना बकाल, कौशल्या बुरकूल, सुमन खरात, दुर्गा नाडे, सरिता लव्हाळे, वैशाली खरात, पार्वती लव्हाळे, पुष्पा बुरकूल, नीता लव्हाळे, कविता चव्हाण, सविता पंडित, भरत अंजुम शेख अबेद, निर्मला डाखोरे, रेणुका तळेकर, रुक्मिना बुरकुल, फरजानबी शेख अजीम इत्यादी उपस्थित होते