चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्र सरकारने नुकतेच विधानसभेत मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे, असा थेट आरोप बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केला आहे. या कायद्याच्या तरतुदी हुकूमशाही पद्धतीची आठवण करून देतात आणि हा कायदा म्हणजे लोकशाहीविरोधी काळा कायदा आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
चिखली तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने २१ जुलै २०२५ रोजी चिखली येथे जनसुरक्षा कायद्याविरोधात आणि तो मंजूर करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी या कायद्याची प्रती जाळून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे, तालुका काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सवडतकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल भाऊ बोंद्रे यांचा आरोप
विधिमंडळात जनसुरक्षा विधेयकावर राज्य सरकारने चर्चा होऊ दिली नाही. विरोधकांची संधी नाकारुन फक्त राक्षसी बहुमताच्या बळावर जनसुरक्षा कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यानुसार सरकार म्हणेल ते बेकायदेशीर कृत्य असेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आंदोलन होतात, त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेतात. पण, सरकारला सामाजिक आंदोलने चिघळून टाकायची आहेत. त्यांना देशविरोधी कृत्य ठरवून ते तुरुंगात टाकू शकतात. त्यामुळे या कायद्याची होळी करुन काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.
1 thought on “चिखलीत काँग्रेसकडून जनसुरक्षा कायद्याची होळी: लोकशाहीविरोधी कायदा असल्याचा राहुल भाऊ बोंद्रेंचा आरोप”