चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा वाजवी मोबदला मिळावा; आ. श्वेता महाले यांचा विधिमंडळात मुद्दा

चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा वाजवी मोबदला मिळावा; आ. श्वेता महाले यांचा विधिमंडळात मुद्दा

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली मतदारसंघातील मौजे घाणमोड, मानमोड, पांढरदेव आणि देवदरी या गावांमधील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी आमदार सौ. श्वेता महाले यांनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. या गावांचा भाग ग्रामीण असूनही येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला गुणांक 1 नुसार म्हणजेच कमी रकमेत दिला जात आहे. हा मोबदला शासनाच्या नियमानुसार गुणांक 2 नुसार द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

आ. श्वेता महाले यांनी यावेळी ‘वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत कायदा, 2013’ चा दाखला देत स्पष्ट केले की, गुणांक 2 म्हणजे ग्रामीण भागातील जमिनीच्या बाजारमूल्याला दुप्पट रक्कम देऊन मोबदला निश्चित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना अधिक रक्कम मिळते आणि त्यात सोलॅशियमसह इतर लाभांचाही समावेश होतो. हा कायदा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी बनवण्यात आला आहे. मात्र, चिखली मतदारसंघातील या गावांमधील शेतकऱ्यांना गुणांक 1 नुसार कमी मोबदला दिला जात असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या गावांमधील भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने 26 मे 2015 आणि 5 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकांनुसार भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी काही निकष ठरवले आहेत. 5 ऑक्टोबर 2021 च्या सुधारित परिपत्रकानुसार, गुणांक 1 नुसार मोबदला देण्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत:

  1. राष्ट्रीय किंवा राज्य मार्गालगत असलेल्या जमिनी.
  2. नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक दर विवरणपत्रात नमूद केलेल्या विकास नियोजन क्षेत्रातील जमिनी.
  3. प्रादेशिक नियोजन क्षेत्रातील बिगरकृषी दर असलेल्या जमिनी.

आ. श्वेता महाले यांनी यावेळी सांगितले की, मौजे घाणमोड, मानमोड, पांढरदेव आणि देवदरी येथील जमिनी वरील कोणत्याही निकषात बसत नाहीत. तरीही या गावांतील शेतकऱ्यांना गुणांक 1 नुसार कमी मोबदला दिला जात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी हा भेदभाव का, असा थेट सवाल सरकारला विचारला.

यासंदर्भात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील काही उदाहरणांचा उल्लेख केला. 2023 मध्ये खडकपूर्णा प्रकल्पातील सिनगाव जहागीर (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकऱ्यांना आणि 2024 मध्ये मौजे भालेगाव (ता. मेहकर) येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला गुणांक 2 नुसार देण्यात आला आहे. या उदाहरणांमुळे चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे, अशी खंत आ. महाले यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर, मौजे घाणमोड, मानमोड, पांढरदेव आणि देवदरी येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देताना सिनगाव आणि भालेगाव येथील शेतकऱ्यांप्रमाणे गुणांक 2 नुसार देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी विधिमंडळात केली. यामुळे या गावांतील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल आणि त्यांचा सरकारवरील विश्वास दृढ होईल, असेही त्या म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!