आमदार निवास कॅन्टीनमध्ये आ. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपले; शिळे जेवण दिल्यामुळे संताप!

आमदार निवास कॅन्टीनमध्ये आ. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपले; शिळे जेवण दिल्यामुळे संताप!

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क):पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत असलेले बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याचा शिळ्या जेवणावरून चांगलाच समाचार घेतला आहे. मंगळवारी (दि. ८ जुलै २०२५) रात्री घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून आमदार गायकवाड यांनी जेवण मागवले होते. त्यांना दिलेल्या डाळीचा वास येत होता आणि ती शिळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी बनियन आणि टॉवेलवरच कॅन्टीन गाठली. त्यांनी कर्मचाऱ्याला डाळीचा वास घेण्यास सांगितले आणि खराब अन्न देण्याचा जाब विचारला. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याचा चांगलाच समाचार घेतला.

व्हायरल व्हिडिओमध्ये गायकवाड कर्मचाऱ्याला म्हणताना दिसत आहेत, “आमदारांना जर असं शिळं आणि निकृष्ट जेवण देत असाल, तर सामान्य लोकांना काय खायला देता?” त्यांनी यापूर्वीही कॅन्टीनच्या अन्नाबाबत दोन-तीन वेळा तक्रार केल्याचे सांगितले, पण सुधारणा झाली नाही. “मी पाच-साडेपाच वर्षांपासून मुंबईत येतोय, पण असं खराब अन्न कधीच मिळालं नव्हतं.

या प्रकरणावर गायकवाड यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवणार आहेत. तसेच, राज्यमंत्री नरहरी झिरवळ यांनाही याबाबत माहिती दिली असून, हा मुद्दा ते विधानसभेत उपस्थित करणार आहेत. “जर आमदारांनाच असं विषारी अन्न दिलं जात असेल, तर सामान्य लोकांचं काय होत असेल? असा जाब विचारायलाच हवा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. विरोधक यावर आक्रमकपणे प्रतिक्रिया देऊ शकतात, तर अनेकदा कर्मचाऱ्याला समजावून सांगितलं होतं, जे काही केलं त्याचा पश्चाताप नाही’ असे म्हणत आमदार गायकवाड यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार अद्याप नोंदवली गेली नसल्याची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “आमदार निवास कॅन्टीनमध्ये आ. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपले; शिळे जेवण दिल्यामुळे संताप!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!