बुलढाणा, (बुलडाणा कव्हरेज न्यूज): दिल्ली येथे २६ आणि २७ जून रोजी झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील प्रांजल प्रविण नरवाडे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात संपूर्ण भारतातून तिसरे स्थान मिळवले आहे. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी प्रांजलने धनुर्विद्या या खेळात आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रांजल बुलढाणा येथील शिवण आर्चरी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक चंद्रकांत इलग सर यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे. तिने आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय आपले प्रशिक्षक इलग सरांना दिले आहे. “माझ्या प्रशिक्षकांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले आणि माझ्या कौशल्याला योग्य दिशा दिली. त्यांच्यामुळेच मी आज या यशापर्यंत पोहोचू शकले,” असे प्रांजलने सांगितले. भविष्यात आणखी उत्तम कामगिरी करण्याचा तिचा निर्धार आहे.
अभिमानास्पद..! वळतीच्या संतोष खरातने ८व्या ओपन इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये रौप्यपदक पटकावले!
प्रांजलने यापूर्वीही शालेय राष्ट्रीय स्पर्धा आणि असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. तिने दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर आणि दोन वेळा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत तिला तिसऱ्या स्थानाचे प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या यशामुळे तिला भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत पुढील तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
अभिमानास्पद..! चिखलीच्या पियुष कोल्हेने खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सुवर्णपदक पटकावले!
प्रांजलच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तिचे कौतुक होत आहे. स्थानिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या या कामगिरीला भविष्यातील ऑलिम्पिक पदकाची आशा असे संबोधले आहे. प्रांजलच्या या यशाने बुलढाण्यातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून, धनुर्विद्या या खेळाला जिल्ह्यात नव्याने बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.