भरोसा (अंकुश पाटील- बुलडाणा कव्हरेज न्यूज): दिनांक १ जुलै २०२५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेरा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, जि. प. पूर्व उर्दू शाळा मेरा खुर्द, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरोसा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर येथे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दप्तर, लेखन पेन आणि इतर आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. शालिग्राम चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी श्री. इंगळे यांनी भूषवले. यावेळी समितीचे विदर्भ कार्याध्यक्ष श्री. सुनिल अंभोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ही भारत सरकारद्वारे नोंदणीकृत संस्था असून, ती ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी देशभर कार्यरत आहे. यासोबतच सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून समिती विविध सामाजिक उपक्रम राबवते. समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हा शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने हाती घेतले आहे. यामध्ये जिल्हा सचिव श्री. सचिन तरमळे, सहसचिव श्री. समाधान पाटणे, सहसचिव श्री. सुनिल जोहरे, चिखली तालुका अध्यक्ष श्री. जीवन जाधव आणि चिखली तालुका कार्याध्यक्ष श्री. शुभम शितोळे यांचा मोलाचा वाटा आहे.
या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान योगायोगाने डॉ. शालिग्राम चव्हाण यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने समिती आणि शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. सुनिल अंभोरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोप्या भाषेत ग्राहक चळवळीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक हक्कांबाबत जागरूक केले आणि त्यांच्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शाळेतील शिक्षक, गावकरी आणि विद्यार्थ्यांनी समितीचे मनापासून आभार मानले.
येत्या काही दिवसांत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ग्राहक चळवळीचे धडे देण्यासाठी विशेष उपक्रम राबवणार आहे. या सामाजिक कार्याचे शिक्षक आणि पालकांनी स्वागत केले आहे. यावेळी श्री. सुनिल अंभोरे, डॉ. शालिग्राम चव्हाण आणि श्री. सचिन तरमळे यांनी ग्राहक चळवळीला बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहर आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी श्री. इंगळे, केंद्रप्रमुख श्री. उकंडा बलकार, मेरा खुर्दचे सरपंच श्री. रमेश अवचार, उपसरपंच श्री. गुड्डू भाऊ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य श्री. गौतम गवई, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जुबेर, श्री. संतोष बळप यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले आणि ग्राहक चळवळीविषयी जागरूकता निर्माण झाली.