मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा-नांदुरा रोडवर रस्त्याच्या कडेला उभे ठेवलेले ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार ८ ऑक्टोबर रोजी रात्री घडला असून, या प्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोराखेडी येथील रहिवासी शेख अलीम शेख जलील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता आपला एमएच-२८ सीसी-२००९ क्रमांकाचा ट्रॅक्टर (किंमत सुमारे ३ लाख ८० हजार रुपये) नांदुरा अर्बन बँकेसमोर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता ट्रॅक्टर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शेख यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, पण ट्रॅक्टरचा काहीही मागोवा लागला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार धांडे करत आहेत.
स्थानिक शेतकरी वर्गात या घटनेमुळे चोरीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्याच्या कडेला वाहने उभी ठेवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रस्त्याच्या कडेला उभे ठेवलेले ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास; बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल..!
Published On: October 16, 2025 10:33 pm
















