बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) – ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने विनायक छगनराव वायाळ यांना “आदर्श ग्रामपंचायत अधिकारी” म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार त्यांना सन २०१८-१९ या कालावधीत ग्रामपंचायत मलगी येथे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला. विनायक वायाळ यांनी मलगी गावाला स्मार्ट ग्राम बनविण्याचे ध्येय ठेवून अनेक उल्लेखनीय कामे केली. त्यांनी गाव १००% ओडीएफ (मुक्त शौचालय) केले, भूमिगत गटार योजनेची अंमलबजावणी करून गाव गटारमुक्त केले, तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळवून दिला.
ग्रामपंचायत व प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधत, गावकऱ्यांना वेळेवर सेवा देण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सन २०१८-१९ साठी त्यांची ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड केली.
या पुरस्काराचे वितरण २ नोव्हेंबर २०२५ रोजी बुलढाणा येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकृतीनंतर विनायक वायाळ म्हणाले,
“हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या कार्याची दखल प्रशासनाकडून घेतली गेली, याचा मला आनंद आहे. या सन्मानामुळे मला भविष्यात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
शेवटी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी संघटना, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यकारणी आणि मलगी गावातील सर्व नागरिकांचे आभार मानले.
अभिमानास्पद..! विनायक वायाळ यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित…
Published On: November 5, 2025 1:14 pm














