करो किंवा मरो! शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू, रविकांत तुपकर आक्रमक..! महाएल्गार सुरू… रविकांत तुपकरांनीही आंदोलनाला दिला ठाम पाठिंबा!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)
शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा सुरू झाला आहे. या लढ्याला समर्थन देण्यासाठी अमरावतीहून शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधव नागपूरकडे रवाना झाले आहेत. या मोर्चात वर्ध्यातूनही अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की, “सरकार शेतकऱ्यांना हलक्यात घेत आहे, पण आता करो किंवा मरोची वेळ आली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि मेंढपाळांच्या मागण्या मान्य न झाल्यास नागपूरमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा अभूतपूर्व लढा उभा राहील.”
त्यांनी पुढे सांगितले की, “महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफी द्यावी. ओल्या दुष्काळाची नुकसानभरपाई, हक्काचा पीकविमा आणि मेंढपाळ तसेच शेतमजुरांना न्याय देणारे ठोस निर्णय घ्यावेत. अन्यथा राज्यातील शेतकरी हे सरकार उलथून लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत.”
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने उतरली असून, शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या आंदोलनात सहभागी होऊन बच्चू कडू यांच्या लढ्याला ठाम पाठिंबा दर्शविला. तुपकर यांनी सांगितले की, “हा लढा केवळ कर्जमाफीसाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरतील.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!