बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेसाठी सर्व्हर डाऊन असल्याने महिलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसी न केल्यास संबंधित महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.🔸 सर्व्हरचा ब्रेक; महिलांची धावपळ..खामगावसह जिल्हाभरात सेतू केंद्रांवर ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने अनेक महिलांना दिवसेंदिवस रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या महिलांना कधी ओटीपी मिळत नाही, तर कधी वेबसाईटच उघडत नाही. यामुळे अनेकांना वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.🔸 ई-केवायसी का गरजेची आहे?या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र लाभासाठी लाभार्थीची ई-केवायसी नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे.ई-केवायसी करताना –लाभार्थीचा आधार क्रमांक पडताळला जातोओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नोंदणी यशस्वी होतेत्यानंतरच लाभार्थीचे नाव पात्र यादीत दाखल होतेजर नोंदणी अपूर्ण राहिली, तर “आपला आधार क्रमांक पात्र यादीत नाही” असा संदेश मोबाईलवर पाठवला जाणार आहे.🔸 “सर्व्हर आमच्या आवाक्याबाहेर” — अधिकारीया संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांनी सांगितले की,“लाभार्थ्यांच्या अडचणी आम्ही समजतो, मात्र सर्व्हरवरील तांत्रिक बाबी आमच्या आवाक्याबाहेर आहेत. शासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत, तरीही अनेकांनी वेळेत केवायसी केलेली नाही. ऑनलाईन व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांचा लाभ थांबणार आहे.”🔸 मुदतवाढीची मागणी जोरात…सेतू केंद्रांवरील तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या आणि कमी वेळ पाहता महिलांकडून १८ नोव्हेंबरनंतर मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. “शासनाने सर्व्हर व्यवस्थित करून केवायसीसाठी मुदत वाढवावी, अन्यथा अनेक पात्र महिलांचा लाभ बंद होईल,” अशी मागणी लाडक्या बहिणींकडून करण्यात आली आहे.🔸 महिलांची चिंता वाढली..सध्या सेतू केंद्रांवर “ई-केवायसी करा अन्यथा लाभ बंद” अशा सूचना लावण्यात आल्या असून, यामुळे महिलांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक लाभार्थी दिवसभर प्रतीक्षा करूनही केवायसी करू शकत नसल्याने निराश आहेत.
लाडकी बहिण योजनेत महिलांची मोठी अडचण!**ई-केवायसी न झाल्यास खात्यात पैसे जमा होणार नाहीत; सर्व्हर डाऊनमुळे महिलांचा त्रास वाढला, १८ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत…*
Published On: November 10, 2025 9:02 am













