बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)- मान्सून परतला आहे. असे असले तरीही हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले आहे. परिणामी राज्यासह जिल्ह्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामध्ये आगामी तीन दिवस बुलडाणा जिल्ह्यामध्ये देखील तीन दिवसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे हाताशी आलेल्या तूर, कापूस, सोयाबीन, मका पिकांवर संकटाची चिन्हं आहे.
यंदा मे महिन्याच्या प्रारंभापासून पाऊस कोसळत असलेला बुलडाण्याचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. सप्टेंबर महिन्यात देखील पावसाने कहर केला. जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने अनेकवेळा अतिवृष्टी झाली तर जिल्हयातील शेकडो एकर शेती खरडून गेली आहे. यामुळे शेतकरी आधीच अडचणी सापडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान आले. या नुकसानीची भरपाई अद्याप ही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. ऑक्टोबरच्या सुरुवाती पासून पावसाने उघडीप दिली होती. यातच मागच्या काही दिवसापासून दिवसभर ऑक्टोबर हीट जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र मागच्या काही दिवसापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. दीपावली दरम्यान पावसाने पुन्हा जिल्ह्याला झोडपले. पावसाच्या परतीची चर्चा सुरु असताना अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला मका सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज?
जिल्ह्यामधील काही ठिकाणी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. या नंतर मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, २९ ते ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान, कमाल तापमान २७ ते ३२ अंश आणि किमान २२ ते २४ अंश राहील तर आर्द्रता ६० ते ७० टक्के असून दुपारी उकाडा जाणवणार आहे.
शेतात काढून ठेवलेल्या सुडीवर आले संकट…
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. अतिवृष्टी पश्चात हाताशी राहिलेला सोयाबीन, कापूस, तूर व मका हा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या हाताशी आला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन काढली आहे, त्याच्या सुडया रचल्या आहेत. तूर, कापूस काही प्रमाणात का होईना हाताशी आहे. मात्र आता परतीच्या पावसाने हाताशी आलेल्या या पिकांवर पुन्हा संकट आले आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर सोयाबीन हातचा जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.













