EXCLUSIVE:सिंदखेडराजा नगराध्यक्ष निवडणुकीत रंगणार बहुकोनी सामना! राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन गट, भाजप, शेतकरी संघटना आणि अपक्ष उमेदवार मैदानात उतरणार….

 सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी या वेळी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना थेट मैदानात उतरल्या आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याने निवडणुकीला रंगत आणि चुरस येणार आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिंदे गटाची शिवसेना, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष उमेदवार असे अनेक दिग्गज गट मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी बहुकोनी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पक्षाचे अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी इच्छुकांना अधिकृत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाचे नेते देविदास ठाकरे यांनी सांगितले की, "स्वच्छ प्रतिमा असलेला आणि शहरासाठी वेळ देणारा उमेदवारच नगराध्यक्षपदी हवा. आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि त्यांनी दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणू."
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनराव मेहेत्रे म्हणाले, "महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यास आम्ही निवडणूक लढू. याआधीही दोन वेळा आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष जनतेने थेट निवडून दिले आहेत."
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुभाऊ मेहत्रे यांनी सांगितले, "केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष झाल्यास निधीची कमतरता पडणार नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही सज्ज आहोत."
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्याम मेहेत्रे म्हणाले, "गेल्या पाच वर्षांत सिंदखेडराजा शहराची झालेली दुर्दशा पाहून मन विषण्ण झाले. आता स्वप्नातील सिंदखेडराजा घडवण्यासाठी पक्षाने मला संधी द्यावी."
शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान नगराध्यक्ष सतीश तायडे म्हणाले, "गेल्या पाच वर्षांत कोरोनामुळे दोन वर्षे गेली आणि अनेक कार्यक्रमात वेळ गेला, तरीही उर्वरित काळात आम्ही शहरात विकासात्मक कामगिरी केली. पुढील पाच वर्षांत आणखी मोठा विकास घडवू."
शेतकरी संघटनेचे नेते कैलास मेहत्रे म्हणाले, "गेल्या साडेसहा वर्षांपासून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे. जनतेनेच मला नगराध्यक्षपदासाठी पुढे करावे, अशी मागणी सुरू आहे."
उद्धव ठाकरे सेनेचे नेते दिलीप चौधरी म्हणाले, "शेतकरी वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे आणि सिंदखेडराजा नगरीचा सर्वांगीण विकास व्हावा. चुकीचा उमेदवार निवडल्यास जनतेला पाच वर्ष पश्चात्ताप करावा लागतो. पक्षाने संधी दिल्यास इतिहास घडवू."
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच आणखी एक नेते दीपक ठाकरे म्हणाले, "शहरातील युवकांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सुविधा मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संधी दिल्यास आम्ही ती सोन्याची करू."
एकूणच, सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता बहुकोनी आणि चुरशीची होणार असून प्रत्येक गट आपापल्या बळावर विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर होताच, शहराचे राजकीय तापमान आणखी वाढणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!