चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहराच्या मध्यभागी आज दुपारी अक्षरशः रणांगणाचे दृश्य पाहायला मिळाले. बोत्रेप पेट्रोल पंप ते डीपी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन चिकन विक्रेत्यांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर करून झालेल्या या भांडणामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना दुपारी साधारण १२ वाजताच्या सुमारास घडली. अचानक सुरू झालेल्या आरडाओरड, पळापळ आणि झुंबडीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, या हाणामारीचे मूळ २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका लग्नसमारंभातील किरकोळ वादात आहे. त्या वादाचा राग दोन्ही गटांनी मनात धरला होता, आणि आज तोच वाद पुन्हा उफाळून आला. काही क्षणांत दोन्ही गट आमनेसामने आले आणि रस्त्यावरच हाणामारी सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि त्यांची पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे, तर या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
चिखली शहरात तुंबळ हाणामारी; चिकन विक्रेत्यांमध्ये लाठ्या-काठ्यांचा खेळ, पोलिसांचा तत्पर…













