चिखलीत शिवसेनेची आढावा बैठक ; आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्याने राजकीय धुराळा
युतीबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा स्पष्ट इशारा — “काही ठिकाणी युती, काही ठिकाणी नाही, हे आम्ही होऊ देणार नाही”
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली शहर शिवसेनेच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल दि. ३० ऑक्टोबर राधाबाई खेडेकर विद्यालय येथे इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
बैठकीस जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख, सौ. अनुजाताई सावळे, सौ. जिजाताई राठोड, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, कपिल खेडेकर, अर्जुन नेमाडे, राजू पाटील, शरद हाडे, कल्पनाताई बोधेकर, संतोष भुतेकर, पंजाबराव जावळे, राम देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख विलास घोलप यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शहरातील शिवसेना पदाधिकारी पवन चिंचोले, राहुल शेलकर, विक्रांत नकवाल, राका मेहेत्रे, अमर सुसर, अमर काळे, सतीश हिवाळे, विनोद वनारे, साहिल काझी, योगेश गवई, बलराज शेटे, दीपक मगर, विकी निकाळजे, नारायण देशमाने, संदीप अंभोरे, मदन राऊत व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत हेमंत खेडेकर (माजी नगरसेवक), सचिन चोरघडे, समाधान बांडे, पांडा जेठे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे, व्यापारी असोसिएशनचे राकेश चोपडा यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
बैठकीदरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी स्फोटक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. “युती करायची असेल तर संपूर्ण जिल्ह्यात सन्मानजनक पद्धतीने करा. काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी नाही, असं आम्ही होऊ देणार नाही. चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यात बुलढाण्याची जागा मी सोडतो,” असे गायकवाड म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच धुराळा उडाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मात्र, गायकवाडांच्या या ठाम भूमिकेमुळे चिखलीत शिंदे शिवसेनेने स्वबळावर तयारी सुरु केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“युतीचा निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपूर्ण जिल्हा कमिटी घेणार आहे,” असेही गायकवाड यांनी सांगितले. या घोषणेनंतर चिखली तालुक्याचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.















