चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील चंदन पूर येथे मागील चार ते पाच महिन्यापूर्वी शाळेवरील दोन शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु शिक्षण विभागाने दोन ऐवजी एकच शिक्षक शाळेवर रुजू केला आहे. त्यामुळे शिक्षकां अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यातील चंदनपूर येथे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. शाळेत गावातील १७८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेत ७ शिक्षक कार्यरत होते. परंतु मागील ऑनलाईन शिक्षक बदल्यांमध्ये शाळेतील दोन शिक्षकांच्या दुसऱ्या शाळेत बदल्या करण्यात आल्या. बदलीवर शिक्षण विभाग दोन शिक्षक देतील, अशी आशा गावकऱ्यांना होती. परंतु शिक्षण विभागाने दोनऐवजी एकच शिक्षक शाळेवर रुजू केले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिकनुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान पाहता शाळा समिती अध्यक्ष मखाजी साळवे, सरपंच श्रीकांत गावकऱ्यांनी याची माहिती गटशिक्षण अधिकारी वाघमारे यांना सांगितली असता त्यांच्याकडून शिक्षक देण्याच्या बाबतीत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. केंद्र प्रमुख केवट यांनी सुद्धा पालकांचे समाधान केले नाही. त्यामुळे पालकांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला.
















