पैठण (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या वादावरून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून, तब्बल बारा जणांनी मिळून एका ३५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण करत तिच्या तोंडात जबरदस्तीने विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला सुदैवाने बचावली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
ही घटना १९ मे रोजी पहाटेच्या सुमारास पैठण तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात घडली. कविता गणेश जारवाल (वय ३५, रा. हसनाबादवाडी) या आपल्या १४ वर्षीय मुलगा रचीतसोबत शेतात ट्रॅक्टर घेऊन गेल्या होत्या. त्याच दरम्यान, त्यांचे चुलते महाजन धनसिंग बहुरे, चुलती ढवळाबाई बहुरे, नातेवाईक हरसिंग, धीरज, लताबाई, झुंबरबाई बहुरे (सर्व रा. बेंबळ्याचीवाडी), तसेच शांताबाई प्रताप चंदवाडे (रा. पिंपळगाव, जि. जालना) आणि पाच अनोळखी पुरुष असे मिळून १२ जणांनी मिळून अचानक हल्ला चढवला.
सर्वांनी मिळून महिलेला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी जबरदस्त मारहाण केली. या हल्ल्यात कविताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर झुंबरबाई आणि लताबाई यांनी तिला पकडून ठेवले, तर हरसिंग व धीरज बहुरे यांनी तिचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने विष घालण्याचा प्रयत्न केला.
कविताने आरडाओरड करत मदतीसाठी हाका मारल्या. आवाज ऐकून तिचा भाऊ उदल बहुरे व वहिनी ललिता घटनास्थळी धावत आले. त्यांची चाहूल लागताच हल्लेखोरांनी पळ काढला. जाताना “शेतीत वहिवाट करू दिली नाही, तर तुमचा अपघात घडवू,” अशी धमकी त्यांनी दिल्याचे पीडितेने सांगितले.
त्यानंतर कविताने 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. तातडीने तिचा मुलगा व भाऊ तिला घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात पोहोचले. सुरुवातीला पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने तिला चिकलठाण्याच्या मिनी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
चार दिवस ती आयसीयूमध्ये उपचार घेत होती. शेवटी २२ मे रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणात तिने २३ मे रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींची ओळख पटवण्याचे व अटकेचे काम सुरू आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.