
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गेल्या चार वर्षांपासून अवैध दारू विक्री, मटका, वरली, हातभट्टी, आणि अवैध वाळू वाहतूक यासारखे बेकायदा धंदे बिनदिक्कतपणे चालू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस प्रशासनाकडून या गैरप्रकारांकडे मुद्दामहून कानाडोळा होत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.
कार्तिक ग. खेडेकर आणि विठ्ठल ज्ञा. खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही अंढेरा पोलीस स्टेशनकडून कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. उलट, या अवैध धंद्यांचा जोर दिवसागणिक वाढतच आहे. या गैरप्रकारांमुळे गावातील महिला आणि शाळकरी मुलींना दारूच्या नशेत फिरणाऱ्या व्यक्तींकडून त्रास होत आहे. तसेच, नशेत वाहन चालवल्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून, काही निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या निवेदनात पोलीस कर्मचारी सिद्धार्थ सोनकांबळे यांच्यावर थेट आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या पाठबळामुळेच हे अवैध धंदे बिनबोभाट चालत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सिद्धार्थ सोनकांबळे यांना या भागातून हटवावे, अशी गावकऱ्यांची आग्रही मागणी आहे.
गावकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, पुढील आठ दिवसांत सिद्धार्थ सोनकांबळे यांच्यावर योग्य कारवाई झाली नाही, तर लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन केले जाईल. या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनामुळे अंढेरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस प्रशासन यावर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.