खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव शहरातील सजनपुरी भागात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल जुगनू येथे प्रियकराने प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याने परिसरात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
मृतांमध्ये साहिल उर्फ सोनू राजपूत आणि पायल पवार (रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू आणि पायल यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते नियमितपणे खामगावमध्ये भेटत असत. मंगळवारी रात्री दोघेही हॉटेलमध्ये गेले होते. मात्र, तेथे काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाच्या भरात सोनू राजपूत याने पायलची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली.
हॉटेल कर्मचाऱ्यांना घटनेची कल्पना लागताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेमुळे खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.















