बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शहरातील शिवशंकर नगर परिसरात ६८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी ओढून नेली. ही घटना मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
उषा रमेश भिसे (वय ६८) आपल्या मैत्रीण संगीता सूर्यवंशी यांच्या घरासमोर बोलत उभ्या असताना दोन तरुण दुचाकीवर संशयास्पदरीत्या थांबले होते. क्षणार्धात त्यांनी दुचाकी महिलांच्या दिशेने नेली आणि समोर बसलेल्या तरुणाने भिसे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत बळजबरीने ओढून घेत पळ काढला.
आरडाओरड झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फरार झाले. अंदाजे २५ वर्षे वयोगटातील दोन तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती नागरिकांनी दिली.
उषा भिसे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.













