
गंधारी, लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिवंतपणी मातृभूमीची सेवा, आणि मृत्यूनंतरही तिच्याच कुशीत विश्रांती…” या शब्दांप्रमाणे देशासाठी अखेरचा श्वास घेणाऱ्या गंधारी (ता. लोणार) येथील सुपुत्र शहीद जवान सुनील अंबादास नागरे (वय ३२) यांना आज गावातच शासकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. संपूर्ण गाव अश्रूंनी भरून निघाले होते. “शहीद जवान अमर रहे…” या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
सुनील नागरे यांनी वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती होऊन कठोर प्रशिक्षण घेतले. त्यांनी देशसेवेसाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांची निवड NSG कमांडो म्हणून झाली होती. डिसेंबर महिन्यातच त्यांची बदली मध्यप्रदेशातील सागर येथे झाली होती. कुटुंबासह तिथे स्थायिक होण्याचे त्यांचे स्वप्न होते.
मात्र ४ मे रोजी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले. ही दुःखद बातमी समजताच संपूर्ण गाव हळहळून गेला.
आज ५ मे रोजी सकाळी १०:४५ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत आणि भारत मातेच्या जयघोषात त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी माधुरी, ४ वर्षांचा मुलगा दक्ष, १२ महिन्यांची मुलगी द्विजा, आई-वडील आणि बहीण असा त्यांचा परिवार आहे. दीड वर्षांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते, पण त्याआधीच त्यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
बुलडाणा कव्हरेज कडून शहीद जवान सुनील नागरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशासाठी दिलेले त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.
1 thought on “शहीद जवान सुनील नागरे यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली; गंधारी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..”