
New Rules of IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी मात करत आपल्या विजयाचे खाते उघडले. मुंबई इंडियन्ससाठी मात्र हा आणखी एक अपयशी सामना ठरला. विशेष म्हणजे, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात पुनरागमन करताना पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेटची चूक करताना दिसला, ज्यामुळे त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हार्दिक पंड्याच्या पुनरागमनावरही परिणाम नाही
आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. 2024 च्या शेवटच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ही शिक्षा लागू करण्यात आली होती. परिणामी, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व केले. मात्र, गुजरातविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पुनरागमन करताना पुन्हा तीच चूक करताना दिसला.
स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईला शिक्षा
गुजरात टायटन्सच्या डावात मुंबई इंडियन्सने निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण करू शकली नाहीत. त्यामुळे शेवटच्या षटकात मुंबईला 30 यार्ड सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवण्याची शिक्षा झाली. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यंदाच्या हंगामात स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधारावर बंदी घालण्याऐवजी आयपीएलने डिमेरिट पॉइंट प्रणाली लागू केली आहे, जी तीन वर्षांपर्यंत प्रभावी राहील.
गुजरातने मुंबईसमोर ठेवले 197 धावांचे आव्हान
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 8 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या. साई सुदर्शनने 63, शुभमन गिलने 38, जोस बटलरने 39, तर शेरफेन रदरफोर्डने 18 धावा करत संघाला भक्कम आधार दिला. मुंबईकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
मुंबईच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही
197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ 160 धावांपर्यंतच मजल मारू शकला. सूर्यकुमार यादवने 48, तिलक वर्माने 39, तर नमन धीर व मिचेल सॅंटनरने प्रत्येकी 18 धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवता आला नाही आणि त्यांना 36 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.