
सिंदखेडराजा (राहुल साबळे: बुलडाणा कव्हरेज न्युज):जल जीवन मिशन अंतर्गत दरेगाव येथे पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 2 कोटी 14 लाख 50 हजार 768 रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, या योजनेतील कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असले तरी अद्यापही त्याचा लाभ ग्रामस्थांना मिळालेला नाही. पाण्याची टंचाई कायम असल्याने स्थानिक विहिरी अधिग्रहित कराव्या लागत आहेत. त्यामुळे ही योजना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठीच फायदेशीर ठरत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
या संदर्भात अनेक वेळा तक्रारी शासन दरबारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेचे शेरखाँ पठाण, समाधान गाडे, आत्माराम बंगाळे, गजानन काळे, प्रल्हाद काळुसे आणि समाधान कणखर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 15 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास गावकरी आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.