
विनायक सरनाईक यांनी दिला शेतकऱ्यांना धीर नुकसान भरपाईची केली मागणी”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि चक्रीवादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिके, भाजीपाला आणि फळबागा यावर मोठा परिणाम झाला आहे. आधीच नापिकी आणि खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता आणखी संकट कोसळले आहे.
चिखली तालुक्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने पपई, कांदा आणि शेडनेटमध्ये असलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर संकट आले आहे. सोमठाणा आणि चिखली तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या फळ बाग व शेतीपीकाची पाहणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केली. त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला आणि नुकसान भरपाईसाठी लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे.
बुलढाणा आणि चिखलीत मोठे नुकसान?
बुलढाणा आणि चिखली तालुक्यात मागील चार दिवसांत वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे कांदा बियाणे उत्पादक शेतकरी, आंबा व पपई बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. गोद्री, सोमठाणा, टाकरखेड (मु.) या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सोमठाणा येथे पपईची झाडे वादळात तुटून पडली असून कांदा आणि शेडनेटही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यात कारले, टरबूज आणि इतर फळभाज्यांचेही नुकसान झाले आहे. सोमठाणा येथे आंब्याच्या बागेतील संपूर्ण आंबे झाडांवरून गळून पडले आहेत.शेडनेट उखळून पडले आहे.
शेतकऱ्यांची वाढती चिंता!
या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. ७ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, त्यामुळे नुकसान अधिक वाढण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. ४ एप्रिल रोजी विनायक सरनाईक यांनी सोमठाणा आणि इतर गावांचा दौरा करून शेतकऱ्यांना भेटून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारत वाघमारे,छोटू झगरे,राजेंद्र झगरे,औचितराव वाघमारे, सुभाष झगरे,विठ्ठल झगरे,ज्ञानेश्वर जाधव,विजय परीहार,उमेश झगरे,गणेश झगरे, शिवाजीराव वाघमारे,अमोल झगरे अरुण वाघमारे,अविनाश झगरे,सुनिल वाघमारे,गणेश वाघमारे बाबुराव वाघमारे,जिवन वाघमारे,यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.