
(बुलडाणा कव्हरेज न्यूज): Buldhana Nakh Galti News- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या प्रकरणाने आता आणखी गंभीर स्वरूप धारण केले आहे. केस गळतीने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये आता नखं कमकुवत होऊन गळून पडण्याची समस्या समोर येत आहे. यामुळे नखांचे विद्रूप स्वरूप आणि गळती यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या डिसेंबर 2024 पासून शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले होते. आता या रुग्णांमध्ये नखं कमजोर होणे आणि गळून पडण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
नागरिकांमध्ये संभ्रम आणि प्रश्न (Buldhana Nakh Galti News)
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. डिसेंबरपासून केवळ तपासण्या आणि रक्त नमुने घेण्याचे काम झाले असून, रुग्णांना ठोस उपचार मिळाले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ICMR चे पथक तपासणीसाठी आले होते, मात्र त्यांचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. यामुळे प्रशासन आणि सरकार काय लपवत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नेमका हा कोणता आजार आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे
बुलढाणा येथील आरोग्य अधिकारी (वर्ग एक) डॉ. अनिल बनकर यांनी सांगितले की, शेगाव तालुक्यातील चार गावांमध्ये नखांच्या समस्येने ग्रस्त 29 रुग्ण आढळले आहेत. यापैकी काही रुग्णांमध्ये नखं गळण्याची समस्या आहे. या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, केस गळतीच्या रुग्णांमध्येच नखं गळतीची समस्या दिसून येत आहे. यामागे सेलेनियमच्या वाढत्या प्रमाणाचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
1 thought on “Buldhana Nakh Galti News: केस गळतीच्या प्रकरणाने गंभीर वळण, आता रुग्णांच्या नखांचीही गळती, शेगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण”