
मेहकर (सतीश काळे, बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या काही महिन्यांपासून खामगाव आणि शेगाव तालुक्यात केस गळती (Buldhana Kesgalti) आणि टक्कल पडण्याच्या घटनांनी आरोग्य यंत्रणेला हैराण केले होते. जिल्हा प्रशासनानेही याबाबत गंभीरपणे लक्ष घातले होते. मात्र, या समस्येचे नेमके निदान होण्यापूर्वीच मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावात केस गळतीचा एक रुग्ण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मेहकर तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल घाटबोरी गावातील एका युवकाच्या डोक्यावरील केस गळण्यास सुरुवात झाली. हा प्रकार लक्षात येताच त्याने थेट मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले आणि आपली समस्या डॉक्टरांना दाखवली. वैद्यकीय अधिकारीही हा प्रकार पाहून चक्रावले. त्यांनी या प्रकरणाचा शेगाव आणि खामगाव तालुक्यातील केस गळतीच्या घटनांशी संबंध असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
घाटबोरी येथील विक्की अंभोरे या युवकाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्याला केस गळतीचा त्रास होत आहे. केस गळू नये म्हणून त्याने टक्कलही केले, पण नव्याने आलेले केस हात लावताच गळत आहेत. याची तपासणी मेहकर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चव्हाण यांनी केली. त्यांना हे प्रकरण जिल्ह्यातील केस गळतीच्या घटनांशी मिळतेजुळते वाटल्याने त्यांनी विक्की यांना मल्टी-व्हिटॅमिन आणि अँटी-फंगल औषधे दिली. तसेच, पुढील तपासणी आणि उपचारांसाठी बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी आणि दे साकर्जा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी पत्रही पाठवण्यात आले आहे.
Buldhana Kesgalti: आरोग्य विभागाने तपासणीची गरज
घाटबोरीसारख्या डोंगराळ आणि दुर्गम गावात केस गळतीची समस्या किती लोकांना भेडसावत आहे, याचा अंदाज घेण्यासाठी आरोग्य विभागाने गावात जाऊन नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने पावले उचलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
2 thoughts on “Buldhana Kesgalti: मेहकर तालुक्यात केस गळतीच्या रोगाने घेतली एन्ट्री! घाटबोरीतील युवक ग्रामीण रुग्णालयात”