Advertisement Advertisement

देऊळगाव घुबे येथे शिवजयंती निमित्त भव्य महा आरोग्य शिबिर; २७३ रुग्णांवर मोफत उपचार…..

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे शिवप्रतिष्ठान व विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य महा आरोग्य मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


शिबिरात शरीराच्या विविध आजारांवर उपचार करणारे नामवंत तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. एकूण २७३ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत उपचार व औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचेही वितरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामागे “सर्वप्रथम शरीर सुदृढ, तरच राष्ट्र सुदृढ” हा संदेश देण्याचा हेतू होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी आपल्या मावळ्यांची काळजी घेतली, त्यांच्या आरोग्याची जपणूक केली आणि त्यानंतरच स्वराज्य उभारले. त्याच विचारातून “शरीर चांगलं तर गाव चांगलं, गाव चांगलं तर जिल्हा चांगला, जिल्हा चांगला तर देश चांगला” या ध्येयाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.


याशिवाय शिवजयंतीनिमित्त सकाळी स्वखर्चाने स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबवून परिसराची साफसफाई करण्यात आली व स्मशानभूमीला रंगरंगोटी करण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.


या संपूर्ण उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, आयोजकांनी पुढील काळातही अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!