चिखलीः(बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील सवणा गावात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शुभम गजानन आफुतकर (वय २८, रा. सवणा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत गणेश राजेंद्र आफुतकर (वय २३, व्यवसाय शेती, रा. सवणा) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी घरी असताना त्यांना फोनवरून माहिती मिळाली की, त्यांचा चुलत भाऊ शुभम आफुतकर याने घरातील टिनाखालील बल्लीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शुभम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही घटना १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या अहवालावरून मर्ग क्रमांक १०/२०२६, कलम १९४ बीएनएसप्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुसर हे करीत आहेत.












