Advertisement Advertisement

दारू पिऊन एसटी हाणली, ५७ जणांचा जीव टांगणीला लावला ! दारूड्या चालकामुळे प्रवाशांची धाकधूक, कंडक्टरच्या प्रसंगावधानाने…..

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दारूच्या नशेत तर्रर्र होऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाने तब्बल ५७ प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची गंभीर घटना देऊळगाव मही जवळ घडली. बसचा वेग वळणांवर अनियंत्रित होत असल्याने प्रवाशांच्या काळजात धडकी भरली होती. मात्र, कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत बस सुरक्षित थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे प्रवाशांना तब्बल दीड तास रस्त्यावर ताटकळत बसावे लागले असून संतापाची लाट उसळली आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगाराची लातूर–बुलढाणा ही बस (एमएच-२०-जीसी-२५९४) चालक मनोज बंड व वाहक ए.एच. पवार यांच्या ताब्यात होती. ही बस लातूरहून बीड, अंबड, जालना, देऊळगाव राजा मार्गे बुलढाण्याकडे येत असताना देऊळगाव महीजवळ बस वळणांवर हेलकावे खात असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. चालकाचे बोलणे आणि हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थितीचे गांभीर्य ओळखून वाहकाने तात्काळ बस सुरक्षितस्थळी थांबवली व सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा अपघात टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

दीड तास प्रवासी रस्त्यावर, दुसऱ्या बसने पुढचा प्रवास…..

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंगणे, आदित्य चोपडे व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चिखली आगारप्रमुख जोगदंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी तत्काळ दखल घेत वाहन परीक्षकांना पाठवले. संबंधित चालकाला ताब्यात घेऊन देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.दीड तासानंतर पंढरपूर-बुलढाणा बस घटनास्थळी आल्यावर प्रवाशांना त्यातून पुढे रवाना करण्यात आले.

एसटी प्रशासनावर प्रश्नचिन्ह….

दारू पिऊन सार्वजनिक बस चालवण्याच्या या गंभीर प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी व अल्कोहोल चाचणी केली जाते का? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!