चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गांगलगाव (ता. चिखली) येथील सैनिक प्रमोद मोहन डोंगरे यांनी भारतीय सैन्यदलात 19 वर्षे अविरत सेवा बजावली. त्यांच्या या समर्पित सेवेचा गौरव करण्यासाठी गावकऱ्यांनी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात त्यांचा सत्कार करून गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सैनिक हा देशाचा खरा आत्मा आहे, असे प्रतिपादन यावेळी प्रकाशभाऊ डोंगरे यांनी केले.
प्रमोद डोंगरे यांच्या सैन्यदलातील 19 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गावकऱ्यांना विशेष अभिमान आहे. त्यांनी देशसेवेसाठी दाखवलेले समर्पण आणि शौर्य यामुळे गांगलगावासह संपूर्ण चिखली तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. आपल्या मायभूमीत परतलेल्या या वीराला सन्मानित करण्यासाठी गावाने एकजुटीने हा सोहळा आयोजित केला होता.
“मागेल त्याला विहीर” योजनेमुळे मिळणार मोफत विहीर अनुदान; जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या प्रसंगी चिखली येथील त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने एक भव्य मिरवणूक आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत गावकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सैनिकांच्या शौर्याला आणि त्यागाला मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम विशेष ठरला. प्रत्येक सैनिक आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी आपले जीवन वाहून घेतो. सीमेवर डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या या वीरांमुळे आपण सर्वजण सुखाने आणि निर्भयपणे जीवन जगू शकतो, असे भावनिक उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.
प्रमोद डोंगरे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याने गावातील तरुण पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळाली. सैनिकांच्या या कार्याला शतशः नमन करत, गावकऱ्यांनी “जय जवान”च्या घोषणा दिल्या. हा सोहळा गांगलगावच्या सामाजिक एकतेचे आणि सैनिकांप्रती असलेल्या आदराचे प्रतीक ठरला.
1 thought on “गांगलगावातील सैनिक प्रमोद डोंगरे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला”